पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर ह्यांना 83व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज 19 जुलै. पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर ह्यांना 83व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

केंब्रिज विद्यापीठाचे रँग्लर, स्थिरस्थिती सिद्धांतांचे प्रणेते, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, पुण्यातील आयुका ह्या विख्यात विद्यापीठाचे संस्थापक अशी बहुविध  आेळख असणारे  डॉ. नारळीकर हे एक सुप्रसिद्ध विज्ञानलेखक देखील आहेत. 

समाजात व तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचे माेठे कार्य त्यांच्या लेखनातून साध्य झालेलं आहे.यक्षांची देणगी हा त्यांचा पहिला कथासंग्रह.

ह्यातील कथा वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन गेल्या. गंगाधरपंतांचे पानिपत, उजव्या साेंडेचा गणपती, पुत्रवती भव, कृष्णविवर ह्या कथांमधलं विज्ञान समजायला खूपच साेपं हाेतं. नाैलखा हाराचे प्रकरण ही थेट ऑर्थर कॉनन डॉयलची आठवण करून देणारी शेरलॉक हाेम्स कथा ह्या पुस्तकाचा परमाेच्च बिंदू ठरेल. 

ह्या कथासंग्रहानंतर प्रकाशित झालेल्या त्यांच्या वामन परत न आला, प्रेषित, सूर्याचा प्रकाेप,व्हायरस ह्या कादंबऱ्या व कथासंग्रहांनी विज्ञान साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. एलियन्स  किंवा स्टार वॉर्स असल्या विषयांपेक्षा नारळीकरांच्या कथांमधून मुलभूत विज्ञानातल्या संकल्पना लाेकांना आपसूक कळल्या. 

पूंजभाैतिकी (क्वांटम फिजिक्स), सापेक्षता (रिलेेटीव्हीटी)  ह्या आधुनिक भाैतिकशास्त्रातल्या संकल्पनांवर आधारीत कुठलीही क्लिष्टता न येता लिहीलेली कथा वाचल्यावर कथा ज्यावर आधारीत हाेती अशी एक्स्क्लूजन प्रिंसिंपल किंवा अनसर्टनटी ही  संकल्पना स्पष्ट करणारी कथेच्या शेवटी दिलेली  साेप्या भाषेतील तांत्रिक तळटीपसुद्धा वाचक तेवढ्याच तन्मयतेने वाचतात हे नारळीकरांमधल्या लेखकाचे माेठे यश आहे.

खगोलशास्त्राविषयी  समाजातील वाढते कुतूहल लक्षात घेऊन डॉ. जयंत नारळीकरांनी आकाशाशी जडले नाते हा ग्रंथ लिहीला. मुलभूत खगोलशास्त्राची ओळख करून देणारा हा ग्रंथ काेणीही वाचावा एवढ्या सुलभ मराठीत लिहीलेला आहे.

केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे साहित्य लिहून नारळीकर थांबले नाहीत तर हा दृष्टिकोन निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील पायरी ओलांडण्यासाठी आयुका ह्या खगोलशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाची  स्थापना त्यांनी पुण्यात केली. 

पूर्वीच्या काळी आपल्याकडे असं हाेतं तसं हाेतं हे गप्पा मारण्यासाठी ठीक. पण आधुनिक काळात ते सिद्ध करता येत नसेल तर त्यापलीकडे त्याचा काहीच उपयाेग नाही. ही गाेष्ट वेळीच आवरली नाही तर राष्ट्राचे आधारस्तंभ असणाऱ्या तरूणांसमाेर भ्रमाचा पडदा उभा राहील. त्यापेक्षा विद्यमान काळातील विज्ञान व त्यातील संधी ह्याचा याेग्य परिचय झाला तर सध्याची तरूण पिढी वेळीच  याेग्य मार्गाकडे वळून देशाला खऱ्या अर्थाने जागतिक सन्मान मिळवून देईल. 

ह्यासाठी कुठलाही गाजावाजा न करता आपली जबाबदारी ओळखून प्रयत्न करणाऱ्या डॉ. जयंत नारळीकरांसारख्या विभूतींना विनम्र अभिवादन.

पद्मविभूषण ह्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या नागरी सन्मानाने विभूषीत डॉ. जयंत विष्णू नारळीकरांना  भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान लाभाे हीच सदिच्छा.

Sunil Vidwans

22 जुलै 2009 च्या खग्रास सूर्यग्रहणाची तपपूर्ती

आकाशमित्रच्या संस्मरणीय ग्रहण सहलीतील ही 2009 ची सूर्यग्रहण निरीक्षण सहल.

माेने सर व गाेखले सरांच्या पायलट ट्रीपनंतर जबलपूर हे ठिकाण नक्की झालं हाेतं.

नेहमीप्रमाणेच एक दिवस अंगावर ठेवून आकाशमित्र मंडळाचे सभासद व त्यांचे कुटुंबीय, स्नेही हे 20 जुलै 2009 च्या रात्री कल्याणहून रेल्वेने निघाले.

भर जुलै महिन्यात हे ग्रहण.त्यामुळे दिसण्याची शक्यता कमीच हाेती. परंतु खग्रास सूर्यग्रहणाचा थरार हा वेगळाच असताे. त्यामुळे ताे पहाण्यासाठी चान्स घ्यायला हरकत नव्हती. खग्रास ग्रहण बहुतेकांनी पाहीलेलं नसल्याने उत्सुकता खूपच हाेती. बराेबर अनुभवी मंडळी हाेती.त्यांच्याकडून ती वर्णनं ऐकून काहीतरी चमत्कार हाेऊन पावसाळ्यातील हे ग्रहण दिसावं हीच आस मनात बाळगून हाैशी अभ्यासकांचा ताफा मार्गस्थ झाला.

दुसऱ्या दिवशी 21 जुलैला जबलपूरला पाेहाेचल्यावर तिथलं संपूर्ण ढगाळ वातावरण व रिमझिमणारा पाऊस बघितल्यावर मनात शंकेच्या पाली चुकचुकायला लागल्या हाेत्या. परंतु उघड काेणीच बाेलत नव्हतं.

तिथल्या दत्तमंदिरात मुक्काम हाेता. दुपारी विश्रांतीनंतर काही जणांचा एक चमू ग्रहण निरीक्षणासाठीच्या जागेची पहाणी करायला निघाला. 

सकाळी  लवकर असलेली ग्रहणाची वेळ, पूर्व दिशा इ. गाेष्टींना धरून जबलपूरमधील काही मैदानं, माेकळ्या जागा, उंचावरील एक गढी इ. पाहून शेवटी गीता मंदिरा शेजारील माेकळ्या मैदानाची जागा मुक्रर झाली.

सायंकाळी जबलपूरमधील स्थानिक हाैशी मंडळींच्या एका सभेत माेने सर, गाेखले सर, शिशिर व अभय ह्या मान्यवरांनी बरीच माहीती दिली. शंकांचं निरसन केलं. याेग्य काळजी घेऊन हे ग्रहण पहावं असं आवाहनही केलं.

दुसऱ्या दिवशीचं हवामान, वातावरण ह्याबद्दल इंटरनेटवरून जाणून घेण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. 

डाेळे मिटून पडल्यावर देखिल झाेप लागलेली मंडळी फारच कमी. 

22 जुलैची पहाट झाली. पहाटे चार वाजता बाहेर आकाश निरभ्र झालं हाेतं. चमकणारे तारे पाहून उत्साह संचारला.ग्रहण दिसू शकतं ही आशा बळावली. सगळेजण भराभर आवरायच्या मागे लागले.

सात वाजता बाहेर पडायच्या वेळेस मात्र चित्र पालटलं हाेतं. पहाटेचं निरभ्र आकाश आता संपूर्ण अभ्राच्छादित हाेतं. बसमधून मंडळी निघाली. ठरलेल्या ठिकाणाच्या एक कि.मी. आधीच पाेलीसांनी बस थांबवली. नर्मदेवर पवित्र स्नानासाठी जाणारी गर्दी आवरण्यासाठी वाहनांसाठी रस्ता बंद केला हाेता. इलाज नव्हता. सर्वजण पायी निघाले.

मैदानात पाेहाेचल्यावर ढगाळ हवामानाने सूर्गग्रहण दिसण्याची शक्यता पूर्ण  मावळली हाेती. वेळ झाली.  अचानक गाेखले सरांचा आवाज आला.पश्चिमेला ताेंड करा. आणि एक वेगळाच अनुभव आला. पश्चिमेकडून पूर्वेकडे झपाट्याने सरकणाऱ्या चंद्राच्या सावलीने  भर दिवसा रात्रीसारखा अंधार केला. आजूबाजूच्या घरातील दिवे लागले. 

हा अनुभव ग्रहणाएवढाच थरारक हाेता. 

ग्रहण नाही दिसलं पण हाही अनुभव कमी नव्हता.

आकाशमित्रच्या ग्रहण सहलींमधलं नियाेजन, काैटुंबिक वातावरण ज्येष्ठांचं मार्गदर्शन ह्यामुळे अशा सहलींना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळताे.