पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर ह्यांना 83व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज 19 जुलै. पद्मविभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर ह्यांना 83व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

केंब्रिज विद्यापीठाचे रँग्लर, स्थिरस्थिती सिद्धांतांचे प्रणेते, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, पुण्यातील आयुका ह्या विख्यात विद्यापीठाचे संस्थापक अशी बहुविध  आेळख असणारे  डॉ. नारळीकर हे एक सुप्रसिद्ध विज्ञानलेखक देखील आहेत. 

समाजात व तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचे माेठे कार्य त्यांच्या लेखनातून साध्य झालेलं आहे.यक्षांची देणगी हा त्यांचा पहिला कथासंग्रह.

ह्यातील कथा वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन गेल्या. गंगाधरपंतांचे पानिपत, उजव्या साेंडेचा गणपती, पुत्रवती भव, कृष्णविवर ह्या कथांमधलं विज्ञान समजायला खूपच साेपं हाेतं. नाैलखा हाराचे प्रकरण ही थेट ऑर्थर कॉनन डॉयलची आठवण करून देणारी शेरलॉक हाेम्स कथा ह्या पुस्तकाचा परमाेच्च बिंदू ठरेल. 

ह्या कथासंग्रहानंतर प्रकाशित झालेल्या त्यांच्या वामन परत न आला, प्रेषित, सूर्याचा प्रकाेप,व्हायरस ह्या कादंबऱ्या व कथासंग्रहांनी विज्ञान साहित्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. एलियन्स  किंवा स्टार वॉर्स असल्या विषयांपेक्षा नारळीकरांच्या कथांमधून मुलभूत विज्ञानातल्या संकल्पना लाेकांना आपसूक कळल्या. 

पूंजभाैतिकी (क्वांटम फिजिक्स), सापेक्षता (रिलेेटीव्हीटी)  ह्या आधुनिक भाैतिकशास्त्रातल्या संकल्पनांवर आधारीत कुठलीही क्लिष्टता न येता लिहीलेली कथा वाचल्यावर कथा ज्यावर आधारीत हाेती अशी एक्स्क्लूजन प्रिंसिंपल किंवा अनसर्टनटी ही  संकल्पना स्पष्ट करणारी कथेच्या शेवटी दिलेली  साेप्या भाषेतील तांत्रिक तळटीपसुद्धा वाचक तेवढ्याच तन्मयतेने वाचतात हे नारळीकरांमधल्या लेखकाचे माेठे यश आहे.

खगोलशास्त्राविषयी  समाजातील वाढते कुतूहल लक्षात घेऊन डॉ. जयंत नारळीकरांनी आकाशाशी जडले नाते हा ग्रंथ लिहीला. मुलभूत खगोलशास्त्राची ओळख करून देणारा हा ग्रंथ काेणीही वाचावा एवढ्या सुलभ मराठीत लिहीलेला आहे.

केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे साहित्य लिहून नारळीकर थांबले नाहीत तर हा दृष्टिकोन निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील पायरी ओलांडण्यासाठी आयुका ह्या खगोलशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाची  स्थापना त्यांनी पुण्यात केली. 

पूर्वीच्या काळी आपल्याकडे असं हाेतं तसं हाेतं हे गप्पा मारण्यासाठी ठीक. पण आधुनिक काळात ते सिद्ध करता येत नसेल तर त्यापलीकडे त्याचा काहीच उपयाेग नाही. ही गाेष्ट वेळीच आवरली नाही तर राष्ट्राचे आधारस्तंभ असणाऱ्या तरूणांसमाेर भ्रमाचा पडदा उभा राहील. त्यापेक्षा विद्यमान काळातील विज्ञान व त्यातील संधी ह्याचा याेग्य परिचय झाला तर सध्याची तरूण पिढी वेळीच  याेग्य मार्गाकडे वळून देशाला खऱ्या अर्थाने जागतिक सन्मान मिळवून देईल. 

ह्यासाठी कुठलाही गाजावाजा न करता आपली जबाबदारी ओळखून प्रयत्न करणाऱ्या डॉ. जयंत नारळीकरांसारख्या विभूतींना विनम्र अभिवादन.

पद्मविभूषण ह्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या नागरी सन्मानाने विभूषीत डॉ. जयंत विष्णू नारळीकरांना  भारतरत्न हा सर्वाेच्च नागरी सन्मान लाभाे हीच सदिच्छा.

Sunil Vidwans