प्राध्यापक महेश शेट्टी यांचं What could be the colour of aliens या विषयावर व्याख्यान

आकाशमित्र मंडळ कल्याण तर्फे रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी भौतिकशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक महेश शेट्टी यांचं What could be the colour of aliens या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं.
शेट्टी सरांनी भौतिकशास्त्रातील आणि खगोलशास्त्रातील अनेक संकल्पना अगदी सोप्या शब्दात आणि ओघवत्या शैलीत श्रोत्यांसमोर मांडल्या. एक मानव सेकंदाला किती ऊर्जा निर्मित करतो अशा सध्या आणि सोप्या उदाहरणासह त्यांनी अवकाशातील कुतुहलात्मक रहस्यांचा उलगडा केला. मानवाला असलेल्या पाच सेन्सेस पैकी दृष्टी किवा vision हेच सगळ्यात महत्वाचं का, GMRT दुर्बिणीच्या वायर मेजला गॅप असून सुद्धा ती यंत्रणा कशी चालते याच्या आधारे वेवलेंथ ही संकल्पना अगदी उत्कृष्ट मांडली. एलियन असेलच तर तो कार्बन बेस्ड का असेल, एखादा एलियन मर्क्युरीचं प्राशन करत असेल तर काय अशा गोष्टी किती तथ्यहीन आहेत हे त्यांनी विज्ञानाच्या आधारे लोकांसमोर आणलं. रंग आपल्याला कशामुळे दिसतात, रंगांमागचं भौतिकशास्त्र काय, एखादी वस्तू आपल्याला केव्हा दिसते, प्रकाशाच्या भौतिकशास्त्राचे गूढ यावर सरांनी प्रकाश टाकला.
एखादा विशिष्ट मॉलिक्युल कुठला रंग ट्रांसमिट करतो, कुठल्या एब्सॉर्ब करतो यावर किती महत्त्वपूर्ण गोष्टी अवलंबून आहेत हे सरांनी मांडलं.
ब्लॅक बॉडी, डार्क मॅटर, ताऱ्यांचे रंग, अणू मधील घटक, एखादं मूलद्रव्य संपूर्ण विश्वात कसं सारखेच गुणधर्म बाळगेल, नाणे टॉस करून प्रोबेबिलिटीचा सिद्धांत कसा शास्त्रज्ञ ताऱ्याचे जीवनचक्र समजून घेण्यास वापरतात अशा अफलातून आणि अचंबित करणाऱ्या गोष्टी सरांनी मांडल्या.
सरांचं व्याख्यान आपल्यालाच नवा दृष्टिकोन देणारं, नवा विचार करायला लावणारं होतं.
या व्याख्यानाला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुनील विद्वांस सरांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. हेमंत मोने सरांनी केले तसेच आकाशमित्रची ओळख श्री. शिशिर देशमुख सरांनी केली.

असं अतिशय उत्कंठावर्धक व्याख्यान आयोजित केल्याबद्दल आकाशमित्र चे आभार आणि हा विषय आपल्या समोर मांडल्याबद्दल शेट्टी सरांचे मनःपूर्वक आभार!🙏🏻

By Archit Gokhale

GMRT विज्ञान प्रदर्शन 2026

जायंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप म्हणजेच GMRT ही खोडद – नारायणगावस्थित एक रेडिओ दुर्बीण आहे. ह्या दुर्बिणीच्या आवारात (कॅम्पस मध्ये) दर वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) मोठ्या प्रमाणात साजरा होतो. राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि त्या नंतरचा एक दिवस असे दोन दिवस भव्य विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं.
अशी प्रदर्शनं काय देतात? तर भौतिक सुख ह्या दृष्ट्या काहीच नाही! पण प्रचंड प्रमाणात प्रेरणा मिळते, विज्ञान प्रेमींच्या, शास्त्रज्ञांचा सहवासात राहून खूप काही शिकायला मिळतं, आयुष्यात वेगळं काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, विज्ञानाची अफाट शक्ती कळते, विज्ञानाप्रती कुतूहल निर्माण होतं! आणि हे सगळं एक वेगळाच शब्दात न मांडता येणारा आनंद देऊन जातं.

आकाशमित्र प्रश्न मंजुषा 2026

खगोल प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. ह्या स्पर्धेविषयी अधिक माहिती देतील श्री. संजय पांडे सर.

Total Participants: 207.
Schools: 3 English Medium & 8 Marathi Medium.

From Left: Nupur Desai, Arnav Jamsandekar’s Mother, Arnav Jamsandekar (Winner), Mone Sir, Sanjay Pande, Adarsh Yadav (Winner), Adarsh Yadav’s Father, Sunil Vidwans

आकाशमित्र खगोलशास्त्र अभ्यासवर्ग 2025 उद्घाटन वृत्तांत

काल दिनांक 13 जुलै 2025 रोजी कल्याण येथील ‘आकाशमित्र’ या संस्थेच्या ‘खगोलशास्त्र अभ्यास वर्ग’ उद्घाटनाचा कार्य्क्रम 40 ते 45 श्रोत्यांच्या उपस्थितीत अतिशय आटोपशीरपणे गजानन विद्यालय, कल्याण येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, मविपचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे यांच्या हस्ते झाले. “खगोलशास्त्र हा सर्व विज्ञान शाखांचे उगम आहे”, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. माणसाने आकाशाचा अभ्यास कसा कसा केला, निरीक्षणे कशी नोंदवली आणि त्याचा पुढील पिढ्यांना कसा उपयोग झाला, हेही त्यांनी सांगितले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मराठी विज्ञान परिषदेचे कार्य आणि ती संस्था कशी वृद्धिंगत होत गेली हेही त्यांनी सांगितले. मराठी विज्ञान परिषदेचे वैशिष्ट्यपूर्ण धोरण सांगताना ते म्हणाले, “मी गेली पन्नास वर्षे या संस्थेचा कार्यवाह आहे आणि माझे प्रमोशन अध्यक्ष म्हणून होणार नाही, कारण मराठी विज्ञान परिषदेचा अध्यक्ष हा सन्मानित मराठी शास्त्रज्ञ असणार!”

गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भालेराव मॅडम, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. भालेराव मॅडमनी आकाशमित्र संस्था आणि गजानन विद्यालय यांच्यातील सहकार्याबद्दल सांगितले. 

श्री. शिशिर देशमुख यांनी आकाशमित्र संस्थेची ओळख करून दिली.

श्री. हेमंत मोने सरांनी प्रमुख पाहुण्यांचा अतिशय छान परिचय करून दिला. जसे ‘पु.ल.’ म्हटले की ‘देशपांडे’ हेच आडनाव जोडून येते. तसे ‘अ.पां’ म्हटले की ‘देशपांडे’ हेच आडनाव येते, अशांसारखे दाखले देत, श्री. अ. पां देशपांडे यांच्या कार्याचा आढावा मोने सरांनी घेतला.

आकाशमित्र संस्थेची एक विद्यार्थिनी कु. वल्लरी कुर्डुकर हिने आपल्याला या अभ्यासवर्गाचा स्वतःच्या पुढील वाटचालीसाठी कसा फायदा झाला, हे अगदी मोजक्या शब्दात छान सांगितले. तर श्री. सुनील विद्वांस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला संस्थापक सभासद श्री. सोमण सर, इस्रोतील निवृत्त अधिकारी श्री. कोलगे सर, आर के टी कॉलेजचे प्राध्यापक श्री. चौधरी सर, तसेच महाराष्ट्र मंडळ शाळेचे श्री चव्हाणके सर, डॉ. सुनंदा जाधव मॅडम, निलेश सुरे इत्यादी मान्यवर आकाशमित्र उपस्थित होते.

 या कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. निखिल गेडाम,  श्री. संजय पांडे, श्री. संजय भाटे, श्री. विद्येश कुलकर्णी यांचा महत्त्वाचा वाटा होता.

रविवारीय साप्ताहिक सभा दि. 29.06.25

उद्याच्या सभेत कु.वल्लरीकडून आपल्याला खगोल भौतिकीतील संशोधनाबद्दल महत्वाची माहिती ऐकायला मिळेल. ती उद्या खालील विषयावर बोलणार आहे.

Discoveries of complex molecules in the Interstellar Medium using Laboratory Astrophysics

त्याचप्रमाणे ह्यावर्षी 13 जुलै पासून सुरू होणा-या खगोलअभ्यास वर्गाच्या आयोजनाबाबत व उद् घाटन समारंभ व्यवस्थेबाबत चर्चा होईल.

रविवारीय साप्ताहिक सभा दि. 15.06.25

रात्रीचे आकाशदर्शन करताना आज आपल्याला आकाशात कोणते ग्रह दिसतील , चंद्र दिसेल का? इ. प्रश्न आपल्या मनात येतात. ह्याची उत्तरं कशी मिळवायची? आपणसुद्धा हे सांगू शकू का? इ. कुतूहलजनक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्या आकाशमित्र मंडळातील श्री.निखिल गेडाम ह्यांच्या व्याख्यानात नक्की मिळतील. आणखी काही प्रश्न तुमच्या मनात असले तर त्यांचेही निरसन केले जाईल. तेव्हा उद्याचे श्री. निखिल सरांचे व्याख्यान चुकवू नका.
मार्गदर्शक : श्री हेमंत मोने सर

रविवारीय साप्ताहिक सभा दि. 08-06-25

खगोलीय निरीक्षणासाठी आवश्यक अश्या Indian Astronnomical Ephemeris ह्या संदर्भ ग्रंथाचा वापर कसा करायचा , त्यात कोणती उपयुक्त माहिती असते ह्याविषयी उद्याच्या सभेत बोलतील श्री.विद्येश कुलकर्णी व रोहन यादव.

त्याचप्रमाणे आकाशमित्रच्या व्हॉटस् ॲप ग्रुपवर श्री. निखिल गेडाम ह्यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या खगोल प्रश्नावलीतील काही महत्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा व सखोल माहिती उद्याच्या सभेत दिली जाईल.

रविवारीय साप्ताहिक सभा दि 1.6.25

आपले विश्व (universe) सातत्याने प्रसरण पावत असल्याचे एडविन हबल ह्यांनी सिद्ध केले. परंतु ह्या सिद्धांतात काही त्रुटी असल्याचे खगोलशास्त्रज्ञ Halton Arp ह्यांनी दाखवले.
ह्या संशोधनाबाबत उद्याच्या सभेत श्री.मोने सर बोलणार आहेत. ही माहिती समजून घेण्यासाठी हबल कॉंस्टंट व रेड शिफ्ट ह्याबाबत काही माहिती मिळवल्यास मोने सर सांगणार असलेली माहिती समजावून घेणे सोपे होईल.