चंद्र-गुरू-शनि युती गुरूवार 17 डिसेंबर 2020

चंद्र-गुरू-शनि युती गुरूवार 17 डिसेंबर 2020 - दि. 21 डिसेंबर 2020 राेजी हाेणाऱ्या गुरू व शनिच्या युतीबद्दल आपण सध्या सर्वत्र वाचताेय. ह्याच युती संदर्भातील आणखी एक प्रेक्षणीय दृश्य ठरू शकतं ते 17 डिसेंबर 2020 ह्या दिवशी. कार्तिक अमावास्येनंतर सुरू झालेल्या मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध तृतीयेची चंद्रकाेर गुरूवार 17 डिसेंबरला पश्चिम आकाशात सायंकाळी साडेसहा नंतर शनि व गुरू ह्यांच्याजवळ बघता येईल. चंद्रकाेर व त्याच्या उजव्या हाताला म्हणजेच उत्तरेला असणारा तेजस्वी गुरू नक्कीच आेळखू येतील. गुरूच्या निकट असलेला थाेडासा कमी तेजस्वी शनि देखिल त्यामुळे कळेल. 

त्यानंतर दरराेज चंद्र  पूर्वेकडे व ह्या दाेन्ही ग्रहांपासून लांब जाऊ लागेल.  21 डिसेंबरला चंद्रकाेर बरीच लांब पूर्वेकडे सरकलेली असेल. परंतु 17 डिसेंबरला चंद्राने ह्या दाेन्ही ग्रहांची ओळख आपल्याला करून दिलेली असल्याने 21 डिसेंबरला ते ओळखणे आपल्याला नक्कीच साेपे जाईल. चंद्रकाेर व गुरू-शनि हे विलाेभनीय दृश्य 17 डिसेंबर 2020 या दिवशी नक्की पहा. 

21 तारखेला ह्या दाेन्ही ग्रहांमध्ये एक अंशापेक्षा कमी अंतर असेल. त्या दिवशी ते ओळखू यावेत यासाठी आणि 17 डिसेंबर नंतर 21 तारखेपर्यंत गुरू व शनि कसे जवळ आले ते कळण्यासाठी  17 डिसेंबरच्या चंद्र-गुरू-शनि युतीपासूनच निरीक्षण करणं नक्कीच उत्कंठावर्धक ठरेल