आकाशमित्र मधील सर्वात तरुण मित्र

आज १९ फेब्रुवारी २०२१, संध्याकाळी आकाशमित्र मंडळाचा प्रभाकर खऱ्या प्रभाकराच्या बरोबर अस्ताला गेला. संस्थेचा आजपर्यंतच्या प्रवासातील सर्वात दुःखद दिवस !

सर्वांचे लाडके आणि वंदनीय असे “गोखले सर” आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाहीये.

एक अखंड उत्साहाचा झरा जणू आटला. आकाशमित्रचा कोणताही कार्यक्रम असो, गोखले सरांचा त्यातील उत्साही सहभाग हा उल्लेखनीय असायचा. सरांचे वर्णन एकाच लेखात करणे केवळ अशक्य आहे. 

आकाशमित्रांपैकी कोणीही काही सादर केले की त्या सादरीकरणावर, त्या व्यक्तीला उत्साहित करणारी, प्रेरणा देणारी पहिली प्रतिक्रिया नेहमी गोखले सरांचीच असायची. रविवारच्या meetings (भेटींमध्ये) मध्ये सर्वात सातत्याने, न चुकता येणारे फक्त गोखले सरच होते ह्यात दुमत होणार नाही.

आकाशदर्शनाचा कार्यक्रम म्हणजे तर गोखले सरांचाच म्हणावा लागेल. खगोलशास्त्रासंबंधी सर्वांना माहिती देणे असो किंवा मामणोली आश्रमाबद्दल माहिती देणे असो, सर सर्वात पुढे असायचे. आणि सरांचा सावल्यांचा खेळ आणि जादूचे  प्रयोग बघताना कार्यक्रमाला आलेले सारे आबालवृद्ध अगदी रंगून जायचे. आम्ही सर्व तो खेळ इतक्या वेळा पाहून सुद्धा परत परत प्रत्येक वेळेस बघायचो आणि तितकाच एन्जॉयही करायचो. लोकांना रंगवून ठेवण्यात तर सरांचा हात कोणी धरू शकणार नाही.

रविवारच्या meetings (भेटींमध्ये) मध्ये नेहमी काहीतरी चांगला विषय मांडून किंवा एखादा विचार करायला लावणारा प्रश्न  उपस्थित करून ते सुरवात करायचे म्हणून केवळ बरेच रविवार खगोलशास्त्र विषयावर विचार मंथन घडायचे नाहीतर रविवारच्या  मीटिंगस (भेटी) बंदच झाल्या असत्या. ते श्रेय सुध्दा गोखले सरांनाच.  

Astronomical models करावी तर त्यांनीच. मॉडेल करण्यासाठी आधी त्याची  concept नीट समजून घ्यायची, मग त्याचे एक drawing करायचे. ते तयार करण्यासाठी मनोज सर,  गोविंदराज सर, निलेश यांची मदत घेऊन ते  पूर्ण करणे, येणाऱ्या practical difficulties ना हसत हसत  सामोरे जाऊन त्यावर मात करणे हे सर्व गोखले सरच करू जाणे. आकाशमित्रचा GMRT च्या प्रदर्शनातील दर वर्षीचा सहभाग केवळ गोखले सरांमुळेच झाला. 

गोखले सरांमुळे आकाशमित्र संस्थेचा जनसंपर्क देखील खूप वाढला.  एक परिपक्व व्यक्तिमत्व म्हणून, आणि संस्थेचे उपाध्यक्ष आणि संस्थेचा  आधारस्तंभ ह्या नात्याने सरांचा अधिकार फारच मोठा होता. सरांच्या जाण्याने एक फार मोठी पोकळी संस्थेत निर्माण झाली आहे ती भरून निघणे केवळ  अशक्य. 

सरांचा देह पंचतत्वात विलीन झाला तेव्हा आकाश देखील आपले अश्रू आवरू शकले नाही. 

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!!

-अभय पुराणिक