मंगळाला चंद्राने आपल्यामागे लपविले

टलं तर खगोलशास्त्रीय दृष्टीने अगदी सामान्य गोष्ट – कोणतातरी तारा किंवा ग्रह चंद्रामागे लपणार आणि मग काहीवेळाने चांद्रबिंबामागून बाहेर पडणार. आकाशातील असे अनेक तारे चंद्रामागे रोज  जातात आणि मग बाहेर येतात. मात्र त्या ताऱ्यांच्या कमी तेजस्वीतेमुळे किंवा चांद्रबिंबाच्या अधिक तेजामुळे ते दखलपात्र नसतात. ताऱ्यांमध्ये रोहिणी तारका मात्र चंद्राच्या खास मर्जीतील आणि त्यामुळे तुलनेने त्यांची वरचेवर भेट होत असते. मात्र आज मंगळाला चंद्राने भर उजेडात, आपल्या कोणालाही कळू न देता आपल्यामागे लपविले – काही खट्याळपणा केला तर आईच्या पदरामागे लपणारे छोटे बाळच जणू ! मात्र लहान मुलाने कितीही ठरविलं तरी त्यांची चंचलवृत्ती त्यांना फार वेळ मागे लपूच देत नाही. तसाच हा आजचा मंगळ – २ तास मागे लपून बसला मात्र शेवटी ७:२१ ला त्याचाही संयम सुटलाच व त्याने डोकावून बघितले – चोर पकडला गेला. अन् अनेक आकाशप्रेमींनी त्याला बंदिस्त केले – काहींनी कॅमेऱ्यात, काहींनी डोळ्यात आणि मी…मनात 😊 ! 

(मंगळ, शनि वगैरे विनाकारण blacklist मधे गेलेल्या ग्रहांना सामान्य माणसांनी असं डोळे भरून पाहिलं की आम्हा आकाशमित्रांचं मन भरून येतं बुवा 😜😉! ) 

– अभिजित, पुणे 

– २७ सौर चैत्र १९४३ 

– १७ एप्रिल २०२१