रविवार 21 जून 2020 राेजी हाेणाऱ्या सूर्यग्रहणाविषयी

ज्येष्ठ खगाेलअभ्यासक व आकाशमित्र मंडळ, कल्याण या हाैशी खगाेल अभ्यासकांच्या संस्थेचे अध्यक्ष श्री.हेमंत माेने यांच्याकडून *सुनिल विद्वांस, आकाशमित्र कल्याण यांनी जाणून घेतलेली माहीती प्रश्नाेत्तर स्वरूपात सर्व हाैशी खगाेलप्रेमी व अभ्यासकांकरीता सादर करीत आहे. 
रविवार 21 जून 2020 राेजीच्या सूर्यग्रहणाची काेणती वैशिष्ट्ये सांगता येतील?
प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे 2020 ह्या वर्षात हाेणारे हे पहिलेच सूर्यग्रहण आहे. 26 डिसेंबर 2019 या दिवशी गेल्या वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण झाले हाेते. त्यानंतरचे हाेणारे हे पहिलेच सूर्यग्रहण आहे. ही दाेन्ही लागाेपाठची ग्रहणे कंकणाकृती आहेत. दुसरं म्हणजे,  21 जून हा उत्तर गाेलार्धातील सर्वात माेठा व सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला असण्याचा दिवस. या दिवशी दक्षिणायनाची सुरूवात हाेते. या दक्षिणायनाच्या  दिवशीच  हे कंकणाकृती ग्रहण हाेत आहे. ह्या ग्रहणात सूर्यबिंब व त्याला झाकणारे चंद्रबिंब यांच्या आकारातील फरक फक्त 40 विकला (40 arc seconds) आहे. त्यामुळे चंद्राकडून सूर्यबिंबाचा 98 टक्यांपेक्षा जास्त भाग झाकला जाणार आहे. ह्या ग्रहणात चंद्र   पृथ्वीपासून दूर आहे त्यामुळे हे ग्रहण  कंकणाकृती आहे.  चंद्राच्या दाट सावलीचे टाेक पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाेहाेचू शकणार नाही. परंतु चंद्राची विरळ सावली मात्र पृथ्वीच्या काही भागावर पाेहाेचेल. या ग्रहणातील कंकणाकृती अवस्थेचा कालावधी एका मिनीटांपेक्षा कमी आहे कारण चंद्रबिंब हे सूर्यबिंबापेक्षा फक्त 40 विकलांनी लहान आहे.त्यामुळेच चंद्राकडून सूर्यबिंब 98 टक्यांपेक्षा जास्त झाकले जाणार आहे.  हे कंकणाकृती ग्रहण असल्याने सूर्यबिंबाला चंद्र पूर्ण झाकू शकत नाही त्यामुळे ह्या ग्रहणात खग्रास ग्रहणासारखा  पूर्ण अंधार हाेणार नाही. 
सूर्यग्रहणाची  कंकणाकृती अवस्था कुठल्या प्रदेशात पहायला मिळेल?
चंद्राच्या ऋण छायेचा (antumbra) प्रवास  ज्या प्रदेशातून हाेईल तिथून हे  सूर्यग्रहण कंकणाकृती दिसेल.भारतातील  राजस्थान,हरियाणा,पंजाब या राज्यातील सुरतगढ,सिरसा,कुरूक्षेत्र अशा  ठिकाणांहून ही अवस्था दिसेल.
महाराष्ट्रातून हे ग्रहण दिसेल का?
हाेय. नक्कीच दिसेल. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून हे ग्रहण दिसेल. चंद्रबिंबाच्या   विरळ छायेच्या पट्ट्यात  महाराष्ट्र येत असल्याने महाराष्ट्रातून आपल्याला हे सूर्यग्रहण खंडग्रास स्वरूपाचे दिसणार आहे. महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणांहून पहाताना  सूर्यबिंबाचा साठ ते सत्तर टक्के इतका भाग झाकलेला दिसेल. 
हे सूर्यग्रहण दिसण्याची वेळ काेणती व याचा कालावधी किती आहे?
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे इ.बहुतेक ठिकाणांहून हे ग्रहण सकाळी 10 ते दुपारी 1.30 च्या दरम्यान पहाता येईल. ग्रहणमध्य म्हणजेच सूर्यबिंबाचा जास्तीत जास्त भाग जेव्हा झाकला जाताे ती वेळ साधारणपणे सकाळी 11 वा.40 मिनीटांची आहे.  महाराष्टातील उर्वरित ठिकाणांहून ग्रहण स्पर्श,मध्य व माेक्ष या वेळा पंधरा ते वीस मिनीटांच्या फरकाने अनुभवाला येतील. 
सूर्यग्रहण पहाताना काय काळजी घ्यावी?
भारतातून हे ग्रहण कंकणाकृती व खंडग्रास अशा स्वरूपाचे  दिसणार आहे. सूर्यबिंबाचा काही भाग उघडाच रहाणार असल्याने सूर्यग्रहण पहाताना केवळ ग्रहण पाहण्यासाठी बनवलेल्या विशिष्ट ग्रहण चष्म्यातूनच ते पहावे. नाहीतर डाेळ्यांना इजा हाेईल. ग्रहण चष्म्यातून देखिल सू्र्यबिंबाकडे  सतत पाहू नये. इतर गाेष्टी उदा. गॉगल वगैरेतून सूर्यग्रहण पाहू नये. कारण  सूर्य पहाण्यासाठी ते  पुरेसे सुरक्षित नसतात. ग्रहण पहाताना सद्य परिस्थितीत पुरेसे  सामाजिक अंतर राखणे (तन-दूरी) , चेहऱ्यावरील मास्क इ.नियमांची काटेकाेर अंमलबजावणी हाेईल हे पहावे. 
निरीक्षण करताना विद्यार्थ्यांना काेणते स्वाध्याय करता येतील?
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी ग्रहणात स्वतःच्या नाेंदी ठेवाव्यात. दर थाेड्या वेळाने सूर्यबिंब ग्रहण चष्म्यातून कसे दिसले म्हणजे त्यातील भाग कसाकसा आच्छादित हाेत गेला हे गाेलाकार सूर्यबिंब कागदावर काढून सहज दाखविता येईल.  आकृतीखाली वेळ नाेंदवून ठेवावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःलाच ग्रहणाचा प्रवास कसा हाेत गेला हे समजेल. 
सूर्यग्रहणांबद्दल आणखी काय सांगता येईल?
 एखाद्या सूर्यग्रहणानंतर त्या तारखेपासून 18 वर्ष दहा /अकरा दिवसांनी सूर्यग्रहण हाेतेच. हे काेणीही निश्चित सांगू शकताे. कारण त्याला खगाेलीय गणिताचा आधार आहे. त्यानंतर पुन्हा 18 वर्षे दहा किंवा अकरा दिवसांनी आणखी एक ग्रहण हाेईल. अशी ही एक शृंखलाच तयार हाेते. ग्रहणांच्या अशा अनेक शृंखला एका वेळेस अस्तित्वात असतात. ह्या ग्रहण शृंखलांना सॅरॉस शृंखला असे म्हटले जाते. एका सॅरॉस शृंखलेतील ग्रहणे दर 18 वर्षे दहा किंवा अकरा दिवसांनी पुन्हापुन्हा हाेत रहातात. 21 जूनचे सूर्यग्रहण 137 क्र.च्या सॅरॉस शृंखलेतील ग्रहण आहे. 
21 जूननंतर भारतातून सूर्यग्रहण कधी पहाता येईल? 
21 जून 2020 च्या कंकणाकृती सूर्यग्रहणा नंतर  2021 , 2022 या वर्षी देखिल सूर्यग्रहणे भारतातून हाैशी खगाेल अभ्यासकांना पहाता येतील. परंतु यातील एकही ग्रहण खग्रास किंवा कंकणाकृती नसेल.ही सर्व ग्रहणे खंडग्रास स्वरूपाचीच दिसणार आहेत. 2020 नंतर भारतातून दिसणारे कंकणाकृती ग्रहण 21 मे 2031 साली म्हणजे अकरा वर्षानंतरच पहाता येईल. तामिळनाडू व केरळच्या काही भागांतून ही कंकणाकृती अवस्था पहाता येईल. 20 मार्च 2034 राेजी भारतातून खग्रास ग्रहण पहाता येईल.