सोहो धूमकेतू

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी नासाने साेडलेला साेहाे उपग्रह सूर्याची छायाचित्रे टिपण्याचे काम सातत्याने करत असताे. सूर्याच्या जवळपासच्या परिसरात आलेल्या असंख्य गाेष्टी सुद्धा आपसूकच ह्या छायाचित्रांमध्ये दिसतात. ह्यामध्येच असतात सूर्याच्या अतिनिकट जाणारे धुमकेतू. ह्या धूमकेतूंना इंग्रजीत सनग्रेझिंग कॉमेटस् (Sun Grazing Comets) असे म्हटले जाते. 
सूर्याच्या अति जवळ गेल्यामुळे यातील बरेचसे धुमकेतू नष्टच हाेतात. अशा धुमकेतुंचा शाेध अनेकांनी नासाच्या साेहाे  उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांवरून आत्तापर्यंत लावला आहे. छायाचित्रात  बिंदुवत दिसणारी वस्तू ही धुमकेतू आहे की आणखी काही हे ठरविण्यासाठी  अभ्यासकाचीच नजर हवी. साेहाे उपग्रहाच्या छायाचित्रांमधून शाेधलेल्या  धुमकेतूंना साेहाे धुमकेतू असेच म्हटले जाते. असे धुमकेतू जगभरातील अनेकांनी शाेधले. परंतु त्यात एकही भारतीय नव्हता. मात्र 8 डिसेंबर 2010 यादिवशी कल्याण येथील हाैशी खगाेल अभ्यासकांच्या आकाशमित्र मंडळ संस्थेचे अभ्यासू सभासद  शिशिर देशमुख यांनी शाेधलेल्या साेहाे उपग्रहाला मान्यता मिळाली व असा धुमकेतू शाेधणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यानंतर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन इतर काही भारतीयांनी आणखी   साेहाे धुमकेतू शाेधले. 
एका भारतीयाकडून पहिल्यांदा शाेधल्या गेलेल्या साेहाे धुमकेतूच्या शाेधाला आज दहा वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने आकाशमित्र मंडळाच्या शिशिर देशमुख यांचे अभिनंदन.
-सुनिल