आकाशमित्र खगोलशास्त्र अभ्यासवर्ग 2025 उद्घाटन वृत्तांत

काल दिनांक 13 जुलै 2025 रोजी कल्याण येथील ‘आकाशमित्र’ या संस्थेच्या ‘खगोलशास्त्र अभ्यास वर्ग’ उद्घाटनाचा कार्य्क्रम 40 ते 45 श्रोत्यांच्या उपस्थितीत अतिशय आटोपशीरपणे गजानन विद्यालय, कल्याण येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, मविपचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे यांच्या हस्ते झाले. “खगोलशास्त्र हा सर्व विज्ञान शाखांचे उगम आहे”, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. माणसाने आकाशाचा अभ्यास कसा कसा केला, निरीक्षणे कशी नोंदवली आणि त्याचा पुढील पिढ्यांना कसा उपयोग झाला, हेही त्यांनी सांगितले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मराठी विज्ञान परिषदेचे कार्य आणि ती संस्था कशी वृद्धिंगत होत गेली हेही त्यांनी सांगितले. मराठी विज्ञान परिषदेचे वैशिष्ट्यपूर्ण धोरण सांगताना ते म्हणाले, “मी गेली पन्नास वर्षे या संस्थेचा कार्यवाह आहे आणि माझे प्रमोशन अध्यक्ष म्हणून होणार नाही, कारण मराठी विज्ञान परिषदेचा अध्यक्ष हा सन्मानित मराठी शास्त्रज्ञ असणार!”

गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भालेराव मॅडम, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. भालेराव मॅडमनी आकाशमित्र संस्था आणि गजानन विद्यालय यांच्यातील सहकार्याबद्दल सांगितले. 

श्री. शिशिर देशमुख यांनी आकाशमित्र संस्थेची ओळख करून दिली.

श्री. हेमंत मोने सरांनी प्रमुख पाहुण्यांचा अतिशय छान परिचय करून दिला. जसे ‘पु.ल.’ म्हटले की ‘देशपांडे’ हेच आडनाव जोडून येते. तसे ‘अ.पां’ म्हटले की ‘देशपांडे’ हेच आडनाव येते, अशांसारखे दाखले देत, श्री. अ. पां देशपांडे यांच्या कार्याचा आढावा मोने सरांनी घेतला.

आकाशमित्र संस्थेची एक विद्यार्थिनी कु. वल्लरी कुर्डुकर हिने आपल्याला या अभ्यासवर्गाचा स्वतःच्या पुढील वाटचालीसाठी कसा फायदा झाला, हे अगदी मोजक्या शब्दात छान सांगितले. तर श्री. सुनील विद्वांस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला संस्थापक सभासद श्री. सोमण सर, इस्रोतील निवृत्त अधिकारी श्री. कोलगे सर, आर के टी कॉलेजचे प्राध्यापक श्री. चौधरी सर, तसेच महाराष्ट्र मंडळ शाळेचे श्री चव्हाणके सर, डॉ. सुनंदा जाधव मॅडम, निलेश सुरे इत्यादी मान्यवर आकाशमित्र उपस्थित होते.

 या कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. निखिल गेडाम,  श्री. संजय पांडे, श्री. संजय भाटे, श्री. विद्येश कुलकर्णी यांचा महत्त्वाचा वाटा होता.

रविवारीय साप्ताहिक सभा दि. 29.06.25

उद्याच्या सभेत कु.वल्लरीकडून आपल्याला खगोल भौतिकीतील संशोधनाबद्दल महत्वाची माहिती ऐकायला मिळेल. ती उद्या खालील विषयावर बोलणार आहे.

Discoveries of complex molecules in the Interstellar Medium using Laboratory Astrophysics

त्याचप्रमाणे ह्यावर्षी 13 जुलै पासून सुरू होणा-या खगोलअभ्यास वर्गाच्या आयोजनाबाबत व उद् घाटन समारंभ व्यवस्थेबाबत चर्चा होईल.

रविवारीय साप्ताहिक सभा दि. 15.06.25

रात्रीचे आकाशदर्शन करताना आज आपल्याला आकाशात कोणते ग्रह दिसतील , चंद्र दिसेल का? इ. प्रश्न आपल्या मनात येतात. ह्याची उत्तरं कशी मिळवायची? आपणसुद्धा हे सांगू शकू का? इ. कुतूहलजनक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उद्या आकाशमित्र मंडळातील श्री.निखिल गेडाम ह्यांच्या व्याख्यानात नक्की मिळतील. आणखी काही प्रश्न तुमच्या मनात असले तर त्यांचेही निरसन केले जाईल. तेव्हा उद्याचे श्री. निखिल सरांचे व्याख्यान चुकवू नका.
मार्गदर्शक : श्री हेमंत मोने सर

रविवारीय साप्ताहिक सभा दि. 08-06-25

खगोलीय निरीक्षणासाठी आवश्यक अश्या Indian Astronnomical Ephemeris ह्या संदर्भ ग्रंथाचा वापर कसा करायचा , त्यात कोणती उपयुक्त माहिती असते ह्याविषयी उद्याच्या सभेत बोलतील श्री.विद्येश कुलकर्णी व रोहन यादव.

त्याचप्रमाणे आकाशमित्रच्या व्हॉटस् ॲप ग्रुपवर श्री. निखिल गेडाम ह्यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या खगोल प्रश्नावलीतील काही महत्वाच्या प्रश्नांबाबत चर्चा व सखोल माहिती उद्याच्या सभेत दिली जाईल.

रविवारीय साप्ताहिक सभा दि 1.6.25

आपले विश्व (universe) सातत्याने प्रसरण पावत असल्याचे एडविन हबल ह्यांनी सिद्ध केले. परंतु ह्या सिद्धांतात काही त्रुटी असल्याचे खगोलशास्त्रज्ञ Halton Arp ह्यांनी दाखवले.
ह्या संशोधनाबाबत उद्याच्या सभेत श्री.मोने सर बोलणार आहेत. ही माहिती समजून घेण्यासाठी हबल कॉंस्टंट व रेड शिफ्ट ह्याबाबत काही माहिती मिळवल्यास मोने सर सांगणार असलेली माहिती समजावून घेणे सोपे होईल.

रविवारीय साप्ताहिक सभा दि. २५-०५-२५

आकाशमित्र मंडळ रविवारीय साप्ताहिक सभा उद्या दि. २५-०५-२५रोजी दु. ४.३० वा. ठिकाण : गजानन विद्यालय

विख्यात खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषण श्री. जयंत नारळीकर ह्यांचे नुकतेच निधन झाले.

विश्वनिर्मितीच्या स्थिरस्थिती सिद्धांताचे प्रणेते, आयुकाचे संस्थापक, अनेक पुरस्कारांनी सन्मानित,
विज्ञानविषयक सोप्या भाषेत लिहिणारे लेखक इ. अनेकविध स्वरूपाची ओळख असणाऱ्या श्री.नारळीकरांना उद्याच्या सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.

आकाशमित्राचा श्री. नारळीकरांशी अनेक वेळा संपर्क आला होता. आकाशमित्रच्या स्थापनेपासूनच ते आकाशमित्रशी परिचित होते. त्यामुळे काही आकाशमित्रांकडून त्यांच्याविषयीच्या आठवणी ऐकायला मिळतील. 

कोणाला त्यांच्या कार्याविषयी , संशोधनाविषयी बोलावयाचे असल्यास वेळेची मर्यादा पाळून बोलता येईल.

तरी सर्व खगोलप्रेमींनी उद्याच्या सभेसाठी जरूर उपस्थित रहावे.

आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शून्य सावली दिवस’

सुभेदार कट्टा आणि आकाशमित्र मंडळ तर्फे कल्याण येथील सुभाष मैदानात शून्य सावली दिवस अनुभवला.
आज कल्याणकरांनी अनुभवला ‘शुन्य सावली दिवस’. माध्यांनिचा सुर्य डोक्यावर आला असताना ही स्थिती वर्षातुन दोनदा येते,दुपारी १२.३५ वाजल्या नंतर ….प्रत्यक्षपणे ही घटना आज उपस्थित खगोल प्रेमीनी सुभाष मैदानात अनुभवली,
आकाशमिञ संस्थेतर्फे श्री.विद्येश कुलकर्णी सरांनी ही खगोलीय घटना कां घडते हे विषद केले.
आकाशमिञचे श्री.संजय भाटे,श्री.संजय पांडे यांनी चर्चेत सहभाग घेतला,श्री.आर्चित गोखले हे मुलुंडहुन आले होते.
सुभेदार वाडा कट्ट्या तर्फे श्री.दिपक जोशी श्री.आमोद काटदरे ,ज्येष्ठ नागरिक संघाकडुन श्री.माधव नेने,सामाजिक कार्यकर्त्या सौ.विद्या धारप व त्यांचे विद्यार्थी आले होते.
ह्या भौगोलिक घटनेला जाणकार कल्याणकरांनी व विद्यार्थ्यानी चांगली उयस्थिती नोंदवली.

साप्ताहिक सभा दि. 18.5.25

आकाशमित्र मंडळ व सुभेदारवाडा कट्टा ह्याच्यातर्फे पार पडलेल्या कालच्या शून्य सावली दिवसाच्या प्रात्यक्षिकांबद्दलची अधिक माहिती आज दिली जाईल.

त्याचप्रमाणे श्री.निखिल गेडाम ह्यांच्या खगोलशास्त्रीय प्रश्नावलीतील काही प्रश्नांबाबत चर्चा आज होणार आहे.

तरी कृपया जास्तीत जास्त खगोलप्रेमींनी आजच्या सभेस वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती