काल दिनांक 13 जुलै 2025 रोजी कल्याण येथील ‘आकाशमित्र’ या संस्थेच्या ‘खगोलशास्त्र अभ्यास वर्ग’ उद्घाटनाचा कार्य्क्रम 40 ते 45 श्रोत्यांच्या उपस्थितीत अतिशय आटोपशीरपणे गजानन विद्यालय, कल्याण येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे, मविपचे कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे यांच्या हस्ते झाले. “खगोलशास्त्र हा सर्व विज्ञान शाखांचे उगम आहे”, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. माणसाने आकाशाचा अभ्यास कसा कसा केला, निरीक्षणे कशी नोंदवली आणि त्याचा पुढील पिढ्यांना कसा उपयोग झाला, हेही त्यांनी सांगितले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मराठी विज्ञान परिषदेचे कार्य आणि ती संस्था कशी वृद्धिंगत होत गेली हेही त्यांनी सांगितले. मराठी विज्ञान परिषदेचे वैशिष्ट्यपूर्ण धोरण सांगताना ते म्हणाले, “मी गेली पन्नास वर्षे या संस्थेचा कार्यवाह आहे आणि माझे प्रमोशन अध्यक्ष म्हणून होणार नाही, कारण मराठी विज्ञान परिषदेचा अध्यक्ष हा सन्मानित मराठी शास्त्रज्ञ असणार!”
गजानन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भालेराव मॅडम, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. भालेराव मॅडमनी आकाशमित्र संस्था आणि गजानन विद्यालय यांच्यातील सहकार्याबद्दल सांगितले.
श्री. शिशिर देशमुख यांनी आकाशमित्र संस्थेची ओळख करून दिली.
श्री. हेमंत मोने सरांनी प्रमुख पाहुण्यांचा अतिशय छान परिचय करून दिला. जसे ‘पु.ल.’ म्हटले की ‘देशपांडे’ हेच आडनाव जोडून येते. तसे ‘अ.पां’ म्हटले की ‘देशपांडे’ हेच आडनाव येते, अशांसारखे दाखले देत, श्री. अ. पां देशपांडे यांच्या कार्याचा आढावा मोने सरांनी घेतला.
आकाशमित्र संस्थेची एक विद्यार्थिनी कु. वल्लरी कुर्डुकर हिने आपल्याला या अभ्यासवर्गाचा स्वतःच्या पुढील वाटचालीसाठी कसा फायदा झाला, हे अगदी मोजक्या शब्दात छान सांगितले. तर श्री. सुनील विद्वांस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला संस्थापक सभासद श्री. सोमण सर, इस्रोतील निवृत्त अधिकारी श्री. कोलगे सर, आर के टी कॉलेजचे प्राध्यापक श्री. चौधरी सर, तसेच महाराष्ट्र मंडळ शाळेचे श्री चव्हाणके सर, डॉ. सुनंदा जाधव मॅडम, निलेश सुरे इत्यादी मान्यवर आकाशमित्र उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. निखिल गेडाम, श्री. संजय पांडे, श्री. संजय भाटे, श्री. विद्येश कुलकर्णी यांचा महत्त्वाचा वाटा होता.